Pahile na me tula #dancecover #marathisongs

Pahile na me tula #dancecover #marathisongs



[matched_content]

हे गाणे मी जेव्हाही ऐकते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एकच कथा येते ती म्हणजे रुक्मिणी आणि श्रीकृष्णाची. खरंतर ह्या गाण्यात कुठेही त्यांचा उल्लेख नाही पण का कुणास ठाऊक मला नेहमीच त्यांचा उल्लेख जाणवतो.

प्रेम हे बाह्यसौंदर्यावर नाही तर भावनांवर अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीला पाहून त्याच्या प्रेमात पडणे साहजिकच आहे पण प्रेम नेहमीच आकर्षण नसते तर मनाचे मनाशी अतूट नाते असते (अर्थातच मनातल्या भावना हा आपल्या मेंदूचाच खेळ आहे ह्या संकल्पनेमध्ये सध्या मी जात नाही आहे ;p) श्रीकृष्णाचे आणि रुक्मिणीचे नाते देखील असेच काहीसे होते.

राधा आणि श्रीकृष्णाचे प्रेम संपूर्ण जगाला अवगत आहे आणि संपूर्ण जगभर त्यांच्या प्रेमाची उदाहरण दिली जातात. पण श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या प्रेमकथेबद्दल खूप कमी लोकांना ठाऊक आहे. ज्याच्यावर प्रेम केले त्याला मिळवता येण्यासारखी भाग्यवान लोकं खूप कमी असतात. रुक्मिणी अशीच भाग्यवान होती. ज्याच्यावर तिने प्रेम केले त्याला मिळवण्यासाठी तिने खूप मोठे धाडस केले.

रुक्मिणी, विदर्भातील राजा भीष्मकाची कन्या म्हणून जन्मलेली अत्यंत रूपवान राजकन्या. तिने कृष्णाला कधीच पहिले नव्हते. देवऋषी नारद जेव्हा तिच्या राजवाड्यात श्रीकृष्णाची स्तुती करत होते, ती तिने ऐकली होती. श्रीकृष्णाबद्दल ऐकून ती त्याच्यावर मोहित झाली. कृष्णाशी तिला वेगळेच बंधन जाणवले.

तिचा भाऊ रुक्मि, ज्याला तिचे लग्न शिशुपाल नावाच्या एका दुष्ट राजाशी करायचे होते जो कृष्णाचा शत्रू होता. त्याच्या ह्या राजकीय खेळाचे तिला प्यादे बनायचे नव्हते, दुःखाचे आणि गुलामगिरीचे जीवन तिला जगायचे नव्हते. तिला मुक्त व्हायचे होते, कृष्णासोबत राहायचे होते.

तिने एक धाडसी पाऊल उचलले, आणि कृष्णाला पत्र लिहून, त्याच्यावरचे तिचे प्रेम व्यक्त केले आणि त्याला येऊन तिला नको असलेल्या लग्नापासून वाचवण्यास सांगितले. तिने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, आणि तो जिथे सांगेल तिथे त्याच्या मागे जायला ती तयार झाली. ह्यासाठी जरी तिला तिच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या रागाचा सामना करावा लागला तरीही ती तयार होती. तिला विश्वास होता की कृष्ण तिच्यासाठी येईल आणि त्याने तसे केलेही.

श्रीकृष्णाने रुक्मिणीचे मंदिरात अपहरण केले जिथे ती लग्नाआधी प्रार्थनेसाठी गेली होती. कृष्णाने तिचा भाऊ रुक्मि आणि शिशुपालशी लढाई केली जे त्यांचा पाठलाग करत होते. त्याने रुक्मिणीला त्याची राजधानी द्वारका येथे नेले आणि तिच्याशी मोठ्या थाटामाटात आणि सोहळयात लग्न केले.

रुक्मिणीचे कृष्णावरील प्रेम शाश्वत, शुद्ध आणि निस्वार्थ होते. त्याच्या प्रेमात पडण्यासाठी तिला त्याला पाहण्याची गरज नव्हती. तिच्या मनातली कृष्णाची उपस्थति तिला त्याच्या प्रेमात पाडण्यातही पुरेशी होती. प्रेम ही संधीची नाही तर निवडीची बाब आहे हे तिने सिद्ध केले. तिने कृष्णाची निवड केली आणि त्याने तिची.

रुक्मिणीची ही कथा आपल्याला आपल्या मनावर, भावनांवर विश्वास ठेवायला आणि त्याचे अनुसरण करण्यास प्रेरित करते. ही कथा आपल्याला आठवण करून देते की काही नाती जन्मोजन्मीची असतात आणि कितीही संकटं आली तरी ती तुटने अश्यक्य असतात.

আরো দেখুন